Sunday, 1 September 2013

इंजिनीअरिंग, MBA ची कॅम्पस प्लेसमेंट ऑनलाइन

इंजिनीअरिंग, MBA ची कॅम्पस प्लेसमेंट ऑनलाइन


इंजिनीअरिंग आणि एमबीएची ' कॅम्पस प्लेसमेंट ' आता ' ऑनलाइन ' होऊ घातली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) जॉब पोर्टल देशातील तंत्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणणार असून , कंपन्या या पोर्टलवरच आपला उमेदवार शोधू शकतील!
' जॉब पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. आम्ही त्याचे टेस्टिंगही केले असून , पुढील आठवड्यात ते सुरू होईल ,' असे ' एआयसीटीई ' चे अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांनी ' मटा ' ला सांगितले. अशा प्रकारचे ' जॉब पोर्टल ' तयार करण्याची घोषणा ' एआयसीटीई ' ने गेल्या वर्षीच केली होती.

हे जॉब पोर्टल ' एआयसीटीई ' च्या ' ई-गव्हर्नन्स ' प्रकल्पाचा भाग आहे. यामध्ये देशभरात तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती असेल. विद्यार्थ्याचा सीव्ही आणि प्रत्येक सत्राचे गुण त्यात असतील. ज्या कंपनीला उमेदवार हवा आहे , त्या कंपनीला त्या नोकरीसाठी योग्य असलेल्या विद्यार्थ्यांचा ' सीव्ही ' पाठवला जाईल. त्यातून कंपनी योग्य तो उमेदवार निवडू शकेल. देशभरातील विद्यार्थ्यांचा ' डेटाबेस ' या पोर्टलवर येणार असल्याने निवडीला भरपूर वाव राहील.
विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार असून , एकाच पोर्टलवर विविध कंपन्यांचा शोध घेणे शक्य होईल. विद्यार्थी आपला ' सीव्ही ' या पोर्टलला पाठवू शकतील. सध्या अशी अनेक खासगी जॉब पोर्टल उपलब्ध असली , तरी ती सशुल्क आहेत. ' एआयसीटीई ' चे जॉब पोर्टल मात्र विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असेल.
' कंपन्यांना उमेदवार निवडीसाठी या पोर्टलचा वापर करायचा असेल , तर त्यांना त्यासाठी नोंदणी करावी लागेल ,' असे मंथा यांनी स्पष्ट केले.
' जॉब पोर्टल बरीच आहेत ; पण एखाद्या सरकारी संस्थेने ते तयार करणे हे यातील नावीन्य आहे. मात्र , भरपूर कंपन्या या पोर्टलवर येतील , तेव्हाच ते यशस्वी होईल. त्यासाठी ही यंत्रणा सक्षमतेने राबवणेही गरजेचे आहे ,' असे मत ' सीओईपी ' तील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ. संदीप मेश्राम यांनी व्यक्त केले.

' जॉब पोर्टल ' चे फायदे

विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य
कंपन्यांना देशभरातील विद्यार्थ्यांचा ' डेटाबेस ' एका क्लिकवर
' कॅम्पस ' मध्ये निवड झालेल्यांना आणखी संधी.
 
Librarian
Nitin Joshi

No comments:

Post a Comment