Tuesday 3 September 2013

एमआयटीत अवतरले ‘सत्याग्रही’

Maharashtra Times Dt. 4/9/13

एमआयटीत अवतरले ‘सत्याग्रही’
                    



म. टा. प्रतिनिधी , पुणे

कोथरूडमधील एमआयटी कॉलेजचा कॅम्पस... वेळ दुपारी सव्वादोनची....अजय देवगण , अर्जुन रामपाल आणि प्रकाश झा असे तीन ' सत्याग्रही ' सेलिब्रेटी या कॅम्पसमध्ये अवतरले आणि मोबाइल आणि कॅमेराचा एकच क्लिककिलाट सुरू झाला. या सेलिब्रेटींना जवळून पाहण्यासाठी त्यांची छबी टिपण्यासाठी विद्यार्थी , विद्यार्थिनींची अखंड धडपड सुरू होती.

' एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट ' तर्फे जानेवारी २०१४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या ' भारतीय छात्र संसदे ' च्या नावनोंदणीची सुरुवात सत्याग्रह चित्रपटाच्या टीमच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ' सत्याग्रह ' चे निर्माते , दिग्दर्शक प्रकाश झा , प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण आणि अर्जुन रामपाल , एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड , भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्रा. राहुल कराड , प्रा. डॉ. रवी चिटणीस , प्रा. डी. पी. आपटे , प्रा. डॉ. सायली गणकर , डॉ. एन. टी. मोरे , बाळासाहेब दराडे आदी उपस्थित होते.

' कोणत्याही प्रकारची गाडी चालविण्यासाठी लायसन्सची गरज असते. परंतु , राजकारणी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही , याचा मला खेद वाटतो. भारतात युवकांची संख्या मोठी आहे. या युवांनी बदलाची सुरुवात स्वतःपासून केल्यास देशात अनेक चांगले बदल घडू शकतील. युवकांनी मतदान करताना आपण कोणाला आणि का मतदान करतो आहोत , याचा विचार करूनच मतदान करावे ,' असे अजय देवगण याने सांगितले.

' प्रत्येक व्यक्तीमध्ये एक नायक आणि एक खलनायक दडलेला असतो. त्यातील कोणत्या वृत्तीला जागृत करायचे , हे प्रत्येकाने स्वतःच ठरविले पाहिजे. बदल हवा असेल , तर स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. मी कोणत्याही महिलेला त्रास होईल , असे वर्तन करणार नाही , याची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे ,' असे अर्जुन रामपाल याने सांगितले.

' काही व्यक्ती आणि त्रुटींमुळे सध्याची लोकशाही व्यवस्था बिघडलेली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी युवकांचे योगदान आवश्यक आहे. युवकांनी ही जबाबदारी ओळखली पाहिजे. बदल घडविण्यासाठी लोकांमध्ये मिसळून लोकशाही मार्गानेच परिवर्तन घडवून आणले पाहिजे ,' असे झा यांनी सांगितले.
Librarian
Nitin Joshi 

No comments:

Post a Comment