Tuesday 3 September 2013

पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी ‘C P CELL’



पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी ‘C P CELL’

म. टा. प्रतिनिधी , पुणे

इंजिनीअरिंग- मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणा-या कॅम्पस प्लेसमेंटसारखी सुविधा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही मिळावी , म्हणून पुणे विद्यापीठाने पावले उचलली आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जिल्हापातळीवर ' सेंट्रलाइज्ड प्लेसमेंट सेल ' सुरू करण्यापासून त्याची सुरुवात झाली आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत अशा सेलसाठी लागणारी सर्व मदत पुरविली जाणार आहे. मंडळाचे संचालक डॉ. पंडित शेळके यांनी या उपक्रमाविषयी ' मटा ' ला माहिती दिली. मंडळामार्फत पुणे विद्यापीठामध्ये हवाई दलासाठीचे भरती शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मिळालेला प्रतिसाद आणि त्याबाबतच्या मर्यादा समोर आल्यानंतर मंडळातर्फे जिल्हा पातळीवर असे सेल सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याला संबंधित कॉलेजांकडून आणि मंडळाच्या जिल्हा समन्वयकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुढची पावले मंडळाने उचलल्याचे डॉ. शेळके यांनी स्पष्ट केले.
डॉ. शेळके म्हणाले , ' विद्यापीठांतर्गत येणाऱ्या व्यावसायिक कॉलेजांमध्ये कॉलेजपातळीवरील प्लेसमेंट सेलचे कार्यरत आहेत. त्यांना कंपन्यांकडून मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.
त्याचप्रमाणे उद्योगांना आर्ट्स , कॉमर्स , सायन्समध्ये पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही गरज पडते. या विद्यार्थ्यांसाठी मात्र प्लेसमेंट सेलची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. विभागातर्फे पिंपरी-चिंचवड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चालविण्यात येणाऱ्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून कंपन्यांची अशा विद्यार्थ्यांविषयीची गरज लक्षात आली. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा सेल उभारण्याची कल्पना पुढे आली. '

' कंपन्यांनाही विभागामार्फत कॉलेजांपर्यंत पोहोचविणार '

नगर जिल्ह्यात नगरमधील न्यू आर्ट्स , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आणि श्रीरामपूर येथील सी. डी. जैन कॉलेज , नाशिक जिल्ह्यासाठी पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजमध्ये सध्या असे सेल उभारण्यात येत आहे. या सेलमध्ये जवळपासच्या पाच ते दहा कॉलेजांनी एकत्र येऊन प्लेसमेंटसाठीचे उपक्रम सुरू करण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी आवश्यक कंपन्यांनाही विभागामार्फत संबंधित कॉलेजांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. पंडित शेळके यांनी सांगितले. 
Librarian
Nitin Joshi

No comments:

Post a Comment